वॉशिंग्टन - पुलवामा हल्ल्यानंतर भारताला आत्मरक्षणाचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत अमेरिकेने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. बोल्टन यांनी डोवल यांच्याबरोबर बोलताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. त्याचप्रमाणे दहशतवादाविरुद्ध लढाईत भारताला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
मी अजित डोवल यांच्याबरोबर २ वेळा चर्चा केली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबद्दल मी अमेरिकेच्यावतीने दु:ख व्यक्त करतो. भारताला स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार असून अमेरिकेचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असल्याचे डोवाल यांना सांगितल्याचे जॉन बोल्टन म्हणाले. दहशतवाद्यांना आश्रय देणे बंद करा, असे आम्ही आधीच पाकिस्तानला स्पष्ट केल्याचेही बोल्टन यांनी सांगितले.
पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा व आश्रय देणे थांबवावे, असा इशारा अमेरिकेने पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर दिला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा प्राण गेल्याच्या घटनेचा व्हाईट हाऊसने तीव्र निषेध केला आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी मंत्री सारा सँडर्सनी पाकिस्तानने दहशतवादी गटांना पाठिंबा देणे व त्यांच्या देशातून कारवाया करण्यास मोकळे रान देणे थांबवावे, असा इशाराच दिला आहे. या भागात दहशतवाद व हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा हेतू आहे. पुलवामासारख्या हल्ल्यांमुळे अमेरिका व भारत यांच्यातील दहशतवादविरोधी सहकार्य आणखी मजबूत होईल, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे असेही त्या म्हणाल्या.
पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्लाची जबाबदारी स्वीकारली होती. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गुरुवारच्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवानांचा दुर्दैवी अंत झाला होता. तसेच ५ जवान गंभीर जखमी झाले होते.