रायपूर - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने १८४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, या यादीमध्ये पक्षातील काही नेत्यांचे नाव नसल्यामुळे ते नाराज दिसत आहेत. छत्तीसगड येथेही अशीच बातमी समोर आली आहे. येथे एका माजी महिला आमदाराला भाजपचे तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधातच निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे.
सुमित्रा मारकोले, असे या भाजप आमदाराचे नाव आहे. कांकेर विधानसभा क्षेत्रामधून त्या एकेकाळी भाजपच्या आमदार राहिलेल्या आहेत. मात्र, यावेळी भाजपने जुन्या नेत्यांना उमेदवारी देणे टाळले आहे. त्यात सुमित्रा यांचाही नंबर लागल्याचे समजते. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीमध्ये यांचे नाव नाही. तसेच त्यांच्या मतदार संघामधून पक्षाने दुसऱ्याच व्यक्तीला उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे सुमित्रा संतापल्या आहेत. यांचा संताप एवढा वाढला आहे की छत्तीसगड भाजपचे अध्यक्ष विक्रम उसेंडी यांनी त्यांची समजूत काढण्यासाठी फोन केला असता त्यांनाच खडे बोल ऐकावे लागले.
जे कार्यकर्ते भाजपसाठी जमीनीवर राहून कार्य करतात त्यांना पक्ष डालवत आहे. उलट ज्या व्यक्तीने कधी पक्षाचा झेंडाही उचलला नाही त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, असे सुमित्रा यांचे म्हणणे आहे. जर पक्षाने दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीस उमेदवारी दिली असती तर आपण समाधान मानले असते, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे.
सुमित्रा यांना उमेदवारी न मिळाल्याचे कळल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्जही मागवून घेतला आहे. आता त्या भाजप विरोधात कांकेर येथून निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. ही बाब उसेंडी यांना माहिती होताच त्यांनी समजूत काढण्यासाठी सुमित्रा यांना फोन केला होता. मात्र, सुमित्रा यांनी त्यांनाच धारेवर धरले. तसेच आपण अपक्ष निवडणूक लढवणार, असे जाहीर देखील केले.
भाजपने कांकेर येथून मोहन मडावी यांना उमेदवारी दिली आहे. सुमित्रा यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आता भाजप यावर काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.