पणजी (गोवा) - गोव्यात होणारा आयआयटी प्रकल्प सत्तरीतील शेत-मेळावली येथे प्रस्तावित आहे. मात्र, त्याला स्थानिकांचा विरोध आहे. यावरून बुधवारी पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. याप्रकरणी गुरूवारी 21 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तणावपूर्ण वातावरण असल्याने गावाच्या सर्व सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखला जात आहे.
प्रस्तावित आयआयटी प्रकल्प शेळ-मेळावली गावात नको यासाठी ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. बुधवारी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यावर ग्रामस्थांनी दगडफेक केली. त्यामध्ये पोलिस आणि ग्रामस्थही जखमी झाले. त्यांना वाळपई येथील सामाजिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी वाळपई पोलिस स्थानकावर मोर्चा ही नेला होता. हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केल्यानंतर दगडफेक प्रकरणी 21 जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर दोघांना अटक करण्यात आली होती.
सीमा भागात बंदोबस्त
मेळावलीत तणावपूर्ण वातावरण आहे. येथे गावाच्या सर्व सीमांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाबाहेरील लोकांना गावात प्रवेश करण्यासाठी अटकाव केला जात आहे. काहींना अटक करुत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
दरम्यान, आंदोलक आणि ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करत प्रदेश काँग्रेसच्यावतीने गुरूवारी राज्याचे पोलिस महासंचालक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर, प्रवक्ते अमरनाथ पणजीकर, युवक काँग्रेसचे वरद म्हार्दोळकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - भंडारा : रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश