नवी दिल्ली - कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. दरम्यान, अर्थव्यवस्थेला हातभार लागण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे भारतामध्ये अडकलेले पाकिस्तानमधील 200 नागरिक आज अटारी वाघा सीमेवरून मायदेशी परतले.
गेल्या 15 मार्चला मी भारतामध्ये आले होते. मात्र, लॉकडाऊन झाल्यामुळे मी येथेच अडकून पडले. या काळात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आता अखेर मी घरी जात आहे, असे कराचीमधील रहिवासी सलमा चौधरी यांनी सांगितले. तसेच त्यांनी पाकिस्तानी पराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले.
सर्व पाकिस्तानी नागरिकांना तीन टप्प्यात पाकिस्तानात पाठवण्यात आले आहे. हे पाकिस्तानी नागरिक लॉकडाऊनमुळे गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये अडकून होते. दरम्यान, कोरोनामुळे पाकिस्तान सीमा 19 मार्चला बंद करण्यात आली होती. तसेच दोन्ही देशादरम्यान असलेली रेल्वे सेवाही बंद करण्यात आली होती. यापूर्वी पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांना पाठवण्यासाठी जून महिन्यात तीन दिवसांसाठी सीमा खुली करण्यात आली होती.