पालमपूर (हिमाचल प्रदेश) - चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी तसे नाही. त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. मात्र, आज जगभरात मोठ्या प्रमाणात आपल्याला चहाचे चाहते दिसून येतात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. भारतातही मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन घेतले जाते. भारतातील चहाचे दार्जिलिंग टी, आसाम टी, निलगिरी टी, कांगडा टी असे अनेक लोकप्रिय प्रकार आहेत. यातीलच प्रसिद्ध अशा कांगडाच्या चहाबद्दल आज आपण बोलणार आहोत.
हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात 1850 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाची चहा येथे पिकवली जाते. कांगडा टी हा प्रकारदेखील दार्जिलिंग आणि आसाम टीप्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे. या प्रदेशातील कांगडा आणि मंडी जिल्ह्यात सुमारे 2 हजार 63 हेक्टर क्षेत्रावर कांगडा चहाचे उत्पादन घेतले जाते. येथे चहा लागवडीची सुरुवात इंग्रजांनी केली. त्यांनी हा चहा चीनवरून आणून इथं लावला त्यामुळं या चहाला 'चायनीस हायब्रिड टी' असेही म्हटले जाते.
इंग्रज गेल्यानंतर संशोधन आणि तांत्रिकदृष्ट्या विकास नसल्यानं या चहाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. मात्र, काळानुसार त्यात बदल करण्यात आले आणि आज त्याची निर्यात जगभरात केली जाते. येथील चहामुळे जवळपास 6 हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून यातील बहुतेक चहा इतर देशांमध्ये निर्यात केला जातो. कांगडा चहाचा सुगंध आणि चव त्याला इतर चहाहुन वेगळं करते. याची गुणवत्ता खूप चांगली असून तो आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-एजिंग सारखे गुण आहेत. त्यामुळेच या कांगडा चहाला लंडन आणि अॅमस्टरडॅममध्ये सुवर्ण आणि रौप्यपदक मिळाले आहे. जगतभरात हा चहा इतर चहापेक्षा अधिक पसंत केला जातो, असे म्हणतात.
उत्तम चव, सुगंध आणि गुणवत्तेमुळे कांगडा चहा जगातील सर्वोत्कृष्ट चहांपैकी एक मानला जातो. सुरुवातीला हा चहा फक्त इंग्लंड, स्पेन आणि हॉलंडमध्येच निर्यात केला जात होता. परंतु, आज फ्रान्स, जर्मनी, अफगाणिस्तानसह आशिया व युरोपच्या इतर भागांतही या चहाची निर्यात केली जाते.