भुवनेश्वर : राज्यात भाताचे सर्वाधिक उत्पादन असल्यामुळे 'ओडिशाचा राईस बाऊल' म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेला बरगढ जिल्हा, हा आता कॅन्सर रुग्णांच्या आकडेवारीसाठी कुप्रसिद्ध झाला आहे. या जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वाधिक कॅन्सर रुग्ण आढळून आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, शेतात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारी रासायनिक खते आणि कीटनकनाशके ही यामागची प्रमुख कारणे असल्याची शक्यता आहे.
घातक रसायने असलेली खते आणि कीटकनाशकांच्या अती वापरामुळे, जिल्ह्यातील पिके तर दूषीत झाली आहेतच. मात्र, जिल्ह्यातील जमीन, हवा आणि पाणीही दूषीत झाले आहे.
१९५०मध्ये, हिराकुड धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून या भागात कालव्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातशेती करण्यात येऊ लागली. यानंतर आंध्रप्रदेश सारख्या पाण्याची टंचाई असलेल्या राज्यांमधून अनेक लोक याठिकाणी येऊन राहू लागले.
राज्यातील २६.३ टक्के कॅन्सर रुग्ण एकाच जिल्ह्यात..
कमी जागेत अधिक पीक घेऊन, जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरण्यास सुरूवात केली. या खतांच्या अतीवापराचे दुष्परिणाम जाणून न घेता यांचा वापर केल्यामुळे आज येथील जमीनीखालील पाण्याचा साठाही प्रदूषित झाला आहे. बरगढमधील परिस्थिती इतकी गंभीर आहे, की राज्यातील एकूण कर्करोगाच्या रुग्णांपैकी २६.३ टक्के रुग्ण हे या जिल्ह्यातील आहेत.
कॅन्सर रुग्णांकडे सरकारचे दुर्लक्ष..
जिल्ह्यात एकमेव सरकारी रुग्णालय असल्यामुळे, बहुतांश वेळा उपचारासाठी नागरिकांना नाईलाजाने खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे, ज्यामुळे अर्थातच त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. बरगढमधील कॅन्सरमुक्त झालेल्या रुग्णांनी इतरांना मदत करण्यासाठी म्हणून एक संस्था स्थापन केली आहे. "फायटर्स ग्रुप" असे नाव असलेल्या या संस्थेमार्फत कर्करोग झालेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्यात येते. गेल्या तीन वर्षांपासून ही संस्था जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारण्याची मागणी सरकारला करत आहे. मात्र कॅन्सर रुग्णालय दूरच, सरकार याठिकाणी साधे सर्वेक्षणही करण्यास टाळाटाळ करत आहे.