मुरादाबाद - कारगिलच्या शिखरांवर देशाच्या सीमेचे रक्षण करताना हौतात्म्य आलेल्या जवानांच्या स्मरणार्थ दर वरवर्षी विजय दिवस साजरा केला जातो. या युद्धातील भारतीय जवानांच्या शौर्याच्या गाथा आजही प्रत्येक भारतीयाला गौरवान्वित करतात. याच युद्धात शत्रृचा सामना करताना मुरादाबादच्या जय कुमार यांनाही हौतात्म्य आले होते. ते जाट रेजिमेंटमध्ये तैनात होते.
जय कुमार यांच्या हौतात्म्याचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सार्थ अभिमान वाटतो. आज त्यांचे कुटुंब मुरादाबादच्या हिमगिरी कॉलनीत राहते. त्यांची इच्छा आहे, की जय यांचा छोटा मुलगाही सैन्यात जावा. जय यांची पत्नी सुनीता त्यांच्या आठवणीने उदास होते. मात्र, दुसऱ्याच क्षणी जय कुमार यांचे किस्से ऐकवताना त्यांच्या चेहऱ्यावरह प्रचंड अभिमान दिसून येतो.
जय कुमार हे मुरादाबादमधील छजलैट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरी रवाना गावचे रहिवासी होते. त्यांच्या जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. सात बहिण-भावंडांत ते चौथ्या क्रमांकाचे होते. त्यांना लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची इच्छा होती. शिक्षण सुरू असतानाच ते सैन्यात भरती झाले. कारगिल युद्धाच्या वेळी ते काश्मीरमध्ये तैनात होते. घुसखोरांनी देशाच्या सीमेत प्रवेश केल्याची माहिती मिळताच त्यांच्या जाट रेजिमेंटला कारगिलमध्ये रिपोर्ट करण्यास सांगण्यात आले. यानंतर शत्रूसोबतच्या लढाईत जय कुमार यांना हौतात्म आले. यावेळी त्यांची पत्नी माहेरी होती. त्यांना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी जय कुमार यांच्या हौतात्म्याची माहिती दिली. जय कुमार यांच्या हौतात्म्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबीयांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. मात्र, काळाच्या ओघात त्या घोषणाही वाहून गेल्या.
जय कुमार यांच्या हौतात्म्यानंतर त्यांची वीरपत्नी आपल्या दोन मुलांसह मुरादाबाद येथील हिमगिरी कॉलनीत घर करून राहत आहे. याच दरम्यान वीर जय कुमार यांच्या मोठ्या मुलाला युपी पोलिसात नोकरी मिळाली. तर दूसरा मुलगा अद्याप शिक्षण घेत आहे. पत्नी सुनीता सांगतात, की जय कुमार यांना शेतीची प्रचंड आवड होती. ते जेव्हा सुटीवर येत तेव्हा शेतात काम करत. आपल्या मुलांसाठी त्यांनी अनेक स्वप्नं पाहिली होती. एका मुलाने सैन्यात भरती व्हावे, अशीही त्यांची इच्छा होती. पतीच्या हौतात्म्यानंतर आता, त्यांच्या इच्छेप्रमाणेच आपल्या छोट्या मुलानेही सैन्यात जावे, अशी सुनीता यांचीही इच्छा आहे.
कारगिल युद्धात वीरमरण आलेल्या जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल दिवस साजरा केला जातो. जय कुमार यांच्या हौतात्म्यानंतर सरकारने दिलेली आश्वासने अद्यापही पूर्ण न केल्याने सुनिता नाराज दिसतात. जय कुमार यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे ना त्यांना पेट्रोल पम्प देण्यात आला, ना सरकारने स्मारक तयार केले. सुनिता यांनी स्वखर्चाने गावाबाहेर एक स्मारक तयार केले आहे. या स्मारकाची पाहणी करण्यासाठी दर महिन्याला कुटुंबातील एक सदस्य जात असतो. जय कुमार यांच्या हौतात्म्यानंतर आता मुलाच्या अंगावर केव्हा वर्दी चढते याची वाट सुनिता पाहत आहेत.