जयपूर - राजस्थानात उद्या(शुक्रवारी) राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होणार आहेत. आमदारांची पळवापळवी होवू नये म्हणून काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपने आपआपल्या आमदारांना विविध हॉटेलात ठेवले आहे. उद्या (शुक्रवारी) सकाळी 9 ते 4 या वेळात मतदान होणार आहे. तर 5 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतदानासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईझेशनही करण्यात आले असून सुरक्षेची सर्व काळजी घेण्यात येणार आहे. 'राज्य सभा निवडणुकीसाठी सर्वकाही तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी 9 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. कोरोनामुळे विशेष तयारी करण्यात आली आहे. सर्वकाही सुरक्षेचे नियम पाळण्यात येणार आहेत, असे निवडणूक अधिकारी प्रमिल कुमार माथूर यांनी सांगितले.
मतदानस्थळी आमदारांना येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळे प्रवेशद्वार असणार आहेत. मास्क, सॅनिटाईझर आणि शरीराचे तापमान तपासल्यानंतर आता प्रवेश देण्यात येणार आहे. बसायच्या ठिकाणीही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येणार असल्याचे माथूर म्हणाले.
राज्यसभेच्या तीन जागांसाठी चार उमेदवार उभे आहेत. यातील दोन काँग्रेसतर्फे तर दोन भाजपचे आहेत. काँग्रेसने के. सी. वेगूगोपाल, आणि निरज डांगी यांनी उमेदवारी दिली आहे. तर भाजपने राजेंद्र गेहलोत आणि ओंकार सिंग लखावत यांना उमेदवारी दिली आहे.