बंगळुरु - ईस्टर संडेनिमित्त श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे पर्यटनासाठी गेलेले जनता दल (सेक्युलर) या भारतातील राजकीय पक्षाचे ७ सदस्य बेपत्ता असल्याचे वृत्त आले होते. येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात यांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर झाले आहे. तर, ५ जण अद्याप बेपत्ता आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ही माहिती दिली.
'कोलंबोतील स्फोटांनंतर जेडीएसचे तेथे पर्यटनासाठी गेलेले ७ सदस्य बेपत्ता असल्याची माहिती मला मिळाली होती. यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी नुकतेच स्पष्ट केल्याने मला धक्काच बसला आहे. हे दोघेही माझ्या चांगल्या परिचयाचे होते. या दुःखद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आम्ही त्यांच्यासोबत आहोत,' असे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे.
'श्रीलंकेतील बॉम्बस्फोटात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन कन्नड नागरिकांचा समावेश आहे. के. जी. हनुमंतरायाप्पा आणि एम. रंगप्पा अशी या दोघांची नावे असून ते जेडीएस नेते आहेत. इतर तिघांची नावे लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश अशी आहेत. त्यांची ओळख पटविण्यात आली आहे,' अशी माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेल्समध्ये झालेल्या या आठ साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला आहे. यामध्ये ५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.