नवी दिल्ली : आखाती देशांमध्ये अडकलेल्या ४,५०० भारतीयांना परत आणण्यासाठी 'स्पाईसजेट' कंपनी २५ फेऱ्या करणार आहे. वंदे भारत मोहीमेअंतर्गत या सर्वांना मायदेशी परत आणण्यात येणार आहे. यूएई, सौदी अरेबिया आणि ओमानमधील भारतीय याद्वारे परत येतील.
स्पाईसजेटने याआधी सहा विमानांच्या मदतीने रस-अलखैमाह, जेद्दाह, रियाध आणि दम्माम या ठिकाणांहून हजारपेक्षा अधिक भारतीयांना मायदेशी परत आणले आहे. आता आणखी १९ विमान फेऱ्यांच्या मदतीने या महिन्यात बाकी नागरिकांना परत आणले जाईल.
वंदे भारत मोहीमेसोबतच, जवळपास २००हून अधिक चार्टर्ड विमानांच्या मदतीने सुमारे ३० हजार भारतीयांना स्पाईसजेटने मायदेशी आणले आहे. यासोबतच ३,५१२ कार्गो विमान फेऱ्यांच्या मदतीने, सुमारे २०,२०० टन सामानही देशभरात पोहोचवण्यात आले. कंपनीचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक अजय सिंग यांनी ही माहिती दिली.
रविवारी कंपनीने जाहीर केले होते, की अमेरिकेतील भारतीयांना परत आणण्यासाठीदेखील ११ ते १९ जुलैच्या दरम्यान ३६ विमान फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत.
नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, चार जुलैपर्यंत वंदे भारत मोहिमेअंतर्गत १,८११ विमान फेऱ्यांच्या मदतीने तब्बल २.३७ लाखांहून अधिक भारतीयांना मायदेशी परत आणण्यात आले आहे.
हेही वाचा : दलाई लामांच्या वाढदिवसानिमित्त २०२० हे 'कृतज्ञता वर्ष'; तिबेटने केली घोषणा..