हरिद्वार - कावड यात्रेच्या निमित्ताने हरिद्वारमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. गंगेच्या किनाऱ्यावर कावडधारींची गर्दी होणार हे लक्षात घेऊन, कावडधारींच्या सुरक्षेसाठी विशेष 'जल पोलीस' आणि एसडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत.
जल पोलीस आणि एसडीआरएफ काही विशिष्ट ठिकाणांवरुन कावडधाऱ्यांवर लक्ष ठेऊन असणार आहेत. आतापर्यंत सहा कावडधाऱ्यांना बुडण्यापासून वाचवण्यात आले आहे. आम्ही ठिकठिकाणी धोक्याचा इशारा देणारे फलक देखील लावले आहेत, अशी माहिती हरिद्वारचे पोलीस अधीक्षक जन्मेजय खान्दुरी यांनी दिली.
लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने २३ ते ३० जुलैपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कावड यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, जवळपास सर्व रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरवर्षी कावड यात्रेच्या निमित्ताने गंगेचे पाणी घेण्यासाठी शिवभक्त हरिद्वार, गौमुख आणि गंगोत्रीला भेट देतात. यावर्षी श्रावण पौर्णिमेला (दि. १७) सुरु झालेली कावड यात्रा १५ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.