चंडीगड - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरातील आरोग्य विभाग, प्रशासन आणि पोलीस यंत्रणा युद्ध पातळीवर काम करत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलीस यंत्रणा लॉकडाऊनच्या काळात दिवसरात्र काम करत आहेत. हरियाणाच्या सोनीपत येथील पोलीस कर्मचाऱ्यांशी ईटीव्ही भारतच्या टीमने संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
कोरोना लॉकडाऊनची व्यवस्थित अंमलबजावणी व्हावी यासाठी हरियाणा पोलीस प्रयत्न करत आहेत. सोनीपत येथे ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली असून तेथे पोलीस पहारा देत आहेत. यातील कित्येक कर्मचारी मागील तीन आठवड्यांपासून घरी गेलेले नाहीत, तर काही घरी तर जातात मात्र, त्यांना मुलांना भेटता येत नाही.
देश सध्या संकटात आहे. देशाला आमची गरज आहे आणि देशाची सेवा करणे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. त्यामुळे कितीही कठीण परिस्थितीमध्ये ड्यूटी करावी लागली तरी, पोलीस दल तयार आहे, अशी भावना हवलदार सुरेश यांनी व्यक्त केली.
ड्यूटी संपल्यानंतर मी घरी जातो मात्र, पहिल्यांदा गरम पाण्याने स्वच्छ अंघोळ करतो, सारखा-सारखा हातांना साबण लावतो. कपडेही गरम पाण्याने धुवून टाकतो त्यानंतरच घरात जातो. मात्र, तरीही मुलांना माझ्या जवळ येऊ देत नाही, असे वाहतूक पोलीस असलेल्या अनिल यांनी सांगितले.
सोनीपतचे पोलीस अधिक्षक जितेंद्र सिंह यांना चार वर्षांची मुलगी आहे. ते जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांच्या मुलीला दुसऱया खोलीमध्ये बंद करुन ठेवले जाते, जेणेकरून ती वडिलांच्या जवळ जाणार नाही. दिवसभर कितीतरी लोकांच्या संपर्कात येतो, त्यामुळे कुटुंबापासून दुर राहिलेलेच चांगले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी सांगतले.
सोनीपतसारखीच परिस्थिती देशभरातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांची आहे. संकटाच्या काळात पोलीस दल खंबीरपणे देशातील जनतेच्या सेवेसाठी पाय रोवून उभे आहे.