नवी दिल्ली - हिंसाचारवेळी मूकदर्शक होण्याऐवजी केंद्र सरकारने आपला राजधर्म पाळावा अशी टीका, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली होती. त्यावर केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. सोनिया गांधींनी आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्यावे, आम्हाला राजधर्म शिकवू नये, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
काँग्रेस सरकारच्या काळामध्ये राहुल गांधी, इंदिरा गांधी आणि मनमोहन सिंग यांनी विस्थापितांना नागरिकत्व देण्यासंबधी पाऊले उचलली होती. इंदिरा गांधींनी युगांडाच्या विस्थापीत लोकांची मदत केली होती. तर राजीव गांधी यांनी तामिळ नागरिकांची मदत केली होती. अशोक गेहलोत शरणार्थींना नागरिकत्व देण्यासाठी शिवराज पाटील आणि आडवाणींना पत्र लिहले होते. मात्र, आता सगळे पलटले आहेत. तुम्ही केले तर ठीक आणि तेच आम्ही केले, तर त्यावरून तुम्ही लोकांना भडकवत आहात. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांनी जे केलं ते चुकीचं आहे का ?, असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी केला.
रामलीला मैदानात काँग्रेसने राजधर्माच्या नावावर लोकांना भडकवण्याचे काम केले. आपल्या भाषणात सोनिया गांधी म्हणाल्या होत्या की, ही आरपारची लढाई आहे. ही कोणती भाषा आहे. हा कोणता राजधर्म आहे. तुम्ही आपल्या वक्तव्यांवर लक्ष द्या, आम्हाला राजधर्म शिकवू नका, असेही रविशंकर प्रसाद म्हणाले.
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन दिले. हिंसाचारवेळी मूकदर्शक होण्याऐवजी केंद्र सरकारने आपला राजधर्म पाळावा अशी टीका, सोनिया गांधी यांनी केली होती. दरम्यान, दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४२ झाला आहे. गंभीर जखमी असेलल्या नागरिकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अनेक भागांत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा - दिल्ली हिंसाचार: मृतांचा आकडा ४२ वर, काँग्रेस प्रतिनिधींची हिंसाचारग्रस्त भागाला भेट