नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपण स्वतःच्या खांद्यावर घेणार नाही. मात्र, नवे नेतृत्व उदयास यावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांनी त्यांना लिहिलेल्या पत्राचे उत्तर म्हणून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस कार्यकारिणी समिती, खासदार, माजी केंद्रीय मंत्र्यांनी मिळून काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पक्षांतर्गत काही बदलांची अपेक्षा व्यक्त केली होती. राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणी समितीची उद्या (सोमवार) बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी हे पत्र लिहिले होते.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मात्र सोनिया गांधींनी पक्षाच्या अध्यक्षपदाबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. राजीनामा देताना राहुल गांधींनी काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीला असे सुचवले होते, की पक्षाचा पुढील अध्यक्ष हा गांधी कुटुंबाशी संबंधित नसावा. प्रियांका गांधींनीही एका मुलाखतीमध्ये राहुल यांची याबाबत पाठराखण केली होती.
मात्र, पक्षातील कित्येक नेत्यांना अजूनही गांधी कुटुंबातील सदस्यानेच अध्यक्षपदी असावे असे वाटते. याव्यतिरिक्त आणखी कोणी पक्षाच्या अध्यक्षस्थानी आल्यास पक्षामध्ये फूट पडण्याची भीती हे नेते व्यक्त करत आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये सोनिया गांधींचा राजीनामा स्वीकारला जाईल की नाही याबाबत साशंकता आहे.
हेही वाचा : ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र; पूर्णवेळ व सक्षम पक्षनेतृत्त्वाची मागणी