विल्लूपुरम - तामिळनाडूमधील विल्लूपुरम येथे एका शिक्षक मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह समोर ठेवून लग्न केल्याची घटना घडली. मुलाची आपल्या वडिलांसमोर लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, वडिलांचे अचानक निधन झाल्याने मुलाने त्यांच्या मृतदेहासमोर लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर या घटनेचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहेत. अलेक्झांडर असे त्या शिक्षक मुलाचे नाव आहे.
अलेक्झांडरला त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत लग्न करायचे होते. मात्र, दुर्दैवाने त्याचे वडील दैवामनी यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे अलेक्झांडरची ईच्छा अपूर्ण राहिली, याचे शल्य त्याच्या मनाला बोचू लागले. यावर अलेक्झांडरने त्याच्या नातेवाईंकांना विनंती केली की, त्याचे लग्न त्याच्या वडिलांसमोरच म्हणजे मृतदेहासमोर करावे. अलेक्झांडरची ही विनंती सर्वांनी मान्य केली. दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांनी त्याच्या लग्नाची तयारी केली आणि शुक्रवारी (९ ऑगस्ट) सायंकाळी अलेक्झांडर आणि अन्नपुर्णा यांचा विवाह त्याच्या मृत वडिलांसमोर पार पडला. लग्न म्हणजे आनंदाचा सोहळा मात्र, त्याच्या या सोहळ्यात वडिलांच्या मृत्यूच्या दुखाचे सावट त्या सगळ्यां नातेवाईकांवर होते.
अलेक्झाडंर आणि अन्नपूर्णाई हे दोघेही एका खासगी शाळेत शिक्षक आहेत. यांचा २ सप्टेंबरला विवाह होणार होता. मात्र, त्याआधीच म्हणजे ९ आगस्टला अलेक्झांडरच्या वडिलांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे अलेक्झाडंरने त्यांच्या मृतदेहासमोरच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, दैवामनी यांच्यावर शनिवारी अंत्यविधी करण्याचा निर्णय अलेक्झांडरच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.