इंदौर - भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आमदार आकाश विजयवर्गीय याची गुंडगिरी समोर आली आहे. त्याने महानगरपालिका अधिकाऱ्याला क्रिकेट बॅटने मारहाण केली. अवैध बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या पथकातील अधिकाऱयाला त्यांनी त्यांच्या समर्थकांसह मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्यावर प्राथमिक तक्रार नोंदवण्यात आली असून त्यांना अटक झाली आहे.
भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी क्रिकेटच्या बॅटने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यांच्या समर्थकांसह त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यांच्यासह १० जणांविरोधात प्राथमिक तक्रार दाखल झाली आहे. तसेच, आकाश यांना अटक करण्यात आली आहे. महापालिकेचे पथक अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यासाठी घटनास्थळी आले होते. आकाश यांनी आपल्या समर्थकांसह घटनास्थळी येत अधिकाऱ्याला मारहाण केली. पोलिसांनी कशीबशी या अधिकाऱ्याची सुटका केली.
भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे प्रभारी आहेत. मागील काही दिवसांत निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर बंगालमध्ये हिंसाचार झाला. यासाठी सत्ताधारी पक्षाला जबाबदार धरत भाजपने तृणमूल काँग्रेसविरोधात दंड थोपटले होते. आता आकाश यांच्या प्रकरणानंतर भाजपला 'बॅकफूट'वर जावे लागू शकते.