चेन्नई - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील एका जवानाला वीरमरण आले आहे. त्यांचे नाव पाळनी असून ते गेल्या २२ वर्षांपासून लष्करामध्ये सेवा देत होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारत-चीन सीमेवर सोमवारी मध्यरात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यामध्ये भारताच्या तीन जवानांना वीरमरण आले. तसेच चीनच्या सैन्यामधील काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. याच झटापटीत तामिळनाडूमधील पाळनी यांना वीरमरण आले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. ते गेल्या २२ वर्षांपासून भारतीय लष्करामध्ये सेवा देत होते. तसेच त्यांचा भाऊ देखील लष्करामध्ये असून सध्या राजस्थान येथे सेवा देत आहे. पाळनी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परवार आहे.
त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी, विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन यांनी त्या जवानाला श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना केली.