रायबरेली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने केलेल्या संचारबंदीमुळे अनेकांच्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. तर, हातावर पोट भरणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. रायबरेलीच्या हंसापूर गावामध्ये काही गारुड्यांशी 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली. सध्या सर्वत्र बंद असल्यामुळे गारुड्यांचे कामही बंद झाले आहे.
कोरोनाने अनेकांचे कंबरडे मोडले, यामध्ये अनेक व्यावसायिक, कर्मचारी, खासगी संस्था आदि आहेत. तर, सर्वात जास्त हाल स्थलांतरित कामगार, मजुरांचे होत आहेत. यातील एक सापाचे खेळ दाखवून पोट भरणारा डोंबारी किंवा गारुडी समाज आहे. यातीलच एक रमेश सांगतो, 'या बिमारीबाबत आम्हाला कुणीही माहिती द्यायला नाही आले. आम्हाला जे काही माहिती आहे, ते आम्ही दुसऱ्यांकडून ऐकले. यामुळे घरातून बाहेर पडता येत नाही, बाहेर पाऊल टाकताच पोलीस मारतात. मात्र, घरात खायला एक दाणा नाही अशा परिस्थितीत काय करावे, हा मोठा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.'
तर, याच गावातील अन्य एक ज्येष्ठ नागरिक राकेश प्रसाद म्हणाले, 'लॉकडाऊनच्या सुरुवातीला पोलिसांनी घरातच राहायची चेतावनी दिली होती. यानंतर, अधूनमधून काहीजण येऊन खाण्यापिण्याच्या वस्तू देऊन जातात. मात्र, त्याने सगळ्यांच पोट कसं भरावं हा प्रश्न आहे. आम्हाला या आजाराबद्दल जास्त माहिती नाही आणि कोणी आमच्यापर्यंत याबद्दल माहितीही द्यायला आलं नाही.'
लॉकडाऊनमुळे या गारुड्यांनी त्यांच्या पोसलेल्या सापांना जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आधी सापांना दूध आणि तांदळाच्या पिठाचे पेज द्यायचो मात्र, आता आमच्याच पोटावर दगड आल्याने आम्ही त्यांना जंगलात सोडून दिले असल्याचेही राकेश यांनी बोलताना सांगितले.