कोटा (राजस्थान) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, ज्या लोकांचा उदरनिर्वाह मजुरीवर अवलंबून आहे, त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न उभा ठाकला आहे. परिसरातील समाजसेवी संस्था लोकांची मदत करत आहे. प्रशासनही त्यांच्या स्तरावर प्रयत्न करत आहे. मात्र, या सर्व मदती अपुऱ्या पडत आहेत. यातच काही लोकांनी त्यांचा व्यवसाय बदलून घेतला आहे. ऑटो चालक, सलून चालकांनी भाजीपाला किंवा फळांची स्टॉल लावले आहेत.
ईटीव्ही भारतने या लोकांशी बातचीत केली. या लोकांनी सांगितले, की लॉकडाऊनच्या आधी ते दुसरे काम करत होते. मात्र, आता त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने त्यांनी त्यांचा व्यवसाय बदलला आहे. नगर निगम कॉलनीचे रहिवाशी त्रिलोक राठौड ऑटो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, गेल्या एका आठवड्यापासून ते फळांचा स्टॉल लावत आहेत. दिवसभर काम करून ते 300-400 रुपये कमवत आहेत. छावणी येथील रहिवासी राकेश आधी लग्न समारंभात जेवण बनविण्याचे काम करायचे. मात्र, लॉकडाऊनमुळे ते बंद झाल्याने त्यांनी काकडी विकायला सुरूवात केली. यातून मिळणाऱ्या 200-300 रुपयांवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.