नवी दिल्ली – केंद्र सरकार गावी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी ‘कल्याण रोजगार अभियान योजना’ सुरू करणार आहे. ही योजना राज्य व केंद्र सरकारकडून 6 राज्यांतील 116 जिल्ह्यांत राबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
टाळेबंदीनंतर अनेक कामगारांना त्यांच्या गावी जाण्याची इच्छा आहे. राज्य व केंद्र सरकार मिळून त्यासाठी व्यवस्था करणार आहेत. ज्या राज्यांमध्ये जास्तीत जास्त मजूर परतणार आहेत, त्या राज्यांतील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यामध्ये बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थानचा समावेश आहे. त्या 116 जिल्ह्यांसाठी सरकारच्या 25 योजना गरीब कल्याण रोजगार अभियानांतर्गत एकत्रित देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने ग्रामीण भागातील लोकांसाठी गरीब कल्याण रोजगार अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामधून स्थलांतरित मजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना उदरनिर्वाहाची संधी देण्यात येणार आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 जूनला करणार आहेत. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी उपस्थिती राहणार आहेत.