नवी दिल्ली - देशात उद्योजकतेला चालना देण्यासाठी 'स्किल इंडिया मिशन'ने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे तरुणांमध्ये उद्योजक बनण्याची प्रेरणा वाढीस लागली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. स्किल इंडिया मिशनमुळे तरुणांच्या अंतर्गत क्षमतांना वाव मिळत असून योग्य कौशल्यावर आधारित उद्योग करण्याची प्रेरणा वाढत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. स्किल इंडिया मिशनला पाच वर्ष होत असल्याच्या निमित्ताने त्यांनी ट्विटवरून या योजनेमुळे तरुणांमध्ये पडलेला फरक सांगितला.
तरुणांमध्ये उद्योजक बनण्याची प्रेरणा वाढीस लागण्यासाठी मागील पाच वर्षात स्किल इंडिया मिशनने महत्त्वाची भूमिका निभावली. नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणारे नोकरी देऊ लागले. आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे काम सुरूच राहील, असा विश्वास अमित शाह यांनी ट्विटरवरून व्यक्त केला.
शाह यांनी 'वर्ल्ड युथ स्किल डे'च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. स्किल इंडिया योजनेला आज पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शाह यांनी याजनेचे महत्त्व अधोरेखित केले. कोरोनाच्या काळात सुसंतग राहण्याचा मंत्र म्हणजे कौशल्य आणि कौशल्य वाढ करणे हाच आहे, असे व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले. कौशल्य हे शाश्वत असून काळानुरुप त्याच्यात वाढ होत जाते. त्यामुळे तुमच्यात आणि दुसऱ्यांमधला फरक स्पष्ट दिसून येतो, असे मोदी म्हणाले.