बंगळुरु - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकारकडे केली आहे. तसेच कोरोनाशी लढण्यासाठी राज्याची तयारी कितपत आहे आहे, याचाही श्वेतपत्रिकेत समावेश करावा, अशी मागणी सिद्धारामय्या यांनी केली आहे.
राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवरून आणि कोरोनाशी लढण्याच्या क्षमतेवरून नागरिक चिंतेत आहेत. नागरिकांमधील शंका दुर करून त्यांच्यातील चिंता कमी करण्याची जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनी ‘व्हाईट पेपर’ श्वेत पत्रिका जारी करावी, असे ट्विट सिद्धारामय्या यांनी केले आहे.
सरकारवर प्रश्नांची सरबत्ती
राज्यातील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने किती पैसे खर्च केले. राज्यात किती खाटा आणि व्हेंटिलेटर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई कीट उपलब्ध आहे, याची माहिती सरकारने द्यावी. पंतप्रधान कार्यालयाने राज्याला किती निधी दिला. मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांनी केंद्र सरकारकडे काही मदत मागितली आहे का? पीएम केअर फंडातील कीती रक्कम राज्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी खर्च करण्यात आली का?, अशा प्रश्नांची सरबत्ती सिद्धारामय्या यांनी कर्नाटक सरकारवर केली आहे.
कर्नाटक राज्यात 11 हजार 923 कोरोनाचे रुग्ण आत्तापर्यंत आढळून आले असून यातील 4 हजार 445 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 7 हजार 287 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून 191 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.