गांधीनगर - भाजप अध्यक्ष अमीत शाह हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो आहे. याचा काही लोकांना आनंद झाला तर खुप जणांना आश्चर्य वाटत आहे. एवढच नव्हे तर काही जणांच्या पोटात दुखत आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
ठाकरे म्हणाले, आमचा विचार एक आहे, नेता एक आहे. विपक्षाकडे एक नेता नाही. त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. ते एकमेकांचे पाय ओढतात. आमच्या विरोधात ५६ पक्ष एकवटले त्यांचे फक्त हात मिळाले आहे, आमचे मात्र हृदय ही मिळाले आहे. आम्हाला सत्ता हवी पण आम्ही खुर्चीसाठी भुकेले नाही.
देशाच्या राजकारणाचा विचार केल्यास आम्ही राजकियदृष्ट्या अस्पृष्य होतो. हातात एक भगवा घेऊन निघालो होतो. आता या देशावर भगवा आहे. आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन राजकारण केले.
भाजप आणि आमच्यामध्ये दुरावा होता. पण अमीत शाह घरी आले आमच्याशी चर्चा केली आणि वाद मिटले. आमची विचारधारा एकच असून हिंदुत्व हा आमचा श्वास आहे. श्वासच नसेल तर जीवंत कसे राहणार म्हणुन आम्ही एकत्र आलो आहेत.