नवी दिल्ली - उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मौलाना साद यांच्या विरोधात हजरत निजामुद्दीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत मौलाना सादवर देशद्रोह आणि मनुष्यवधासारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांनी मौलानाविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सय्यद वसीम रिजवी यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मरकजचे मौलाना साद यांनी अतिशय निंदनीय काम केले आहे. कोरोच्या पार्श्वभूमीवर हजारो लोकांना एकत्र बोलवून त्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला आहे. मौलानाचे हे काम देशविरोधी कारवाईसारखेच आहे, यामुळे आता शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : जयपूरमध्ये कोरोनाच्या भीतीवर मात, ऑनलाईन शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घरच्या घरी शिक्षण
जगभरातील डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञ सांगत आहेत की, एका व्यक्तीकडून दुसऱया व्यक्तिला कोरोनाची लागण होते. यावर अद्याप ठोस औषधोपचार उपलब्ध नाही. सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, मौलाना सादचे अनेक ऑडियो-व्हिडियो इंटरनेटवर फिरत आहेत, ज्यात ते लोकांना डॉक्टरांकडे न जाण्यास सांगत आहेत. त्यांच्या या कृतीची भरपाई शेकडो नागरिक करत आहेत, त्यामुळे मौलाना साद विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी सय्यद वसीम रिजवी यांनी केली आहे.