नवी दिल्ली- "जगात कोठेही एक भारतीय म्हणून अपमानित केले जात असेल तर त्याचा शांततापूर्वक विरोध करणे आवश्यक आहे", असे मत भाजप नेत्या शाझिया इल्मी यांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये काही पाकिस्तानी समर्थक काळे झेंडे आणि पोस्टर्स घेऊन निदर्शने करत होते. मात्र, यावेळी 300 पाकिस्तानी समर्थकांवर ३ भारतीय भारी पडले होते.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शुक्रवारी काही पाकिस्तानी समर्थक काळे झेंडे आणि पोस्टर्स घेऊन निदर्शने करत होते. तसेच मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', अशा घोषणाही दिल्या जात होत्या.
दरम्यान भाजपच्या नेत्या शाझिया इल्मी आणि त्यांचे इतर सहकारी एका परिषदेनिमित्त सेऊलमध्ये होते. त्यांनी हा प्रकार बघितला. पाकिस्तानी समर्थक भारतविरोधात निदर्शने करत होते. तसेच 'मोदी दहशतवादी', 'भारत दहशतवादी', असे नारे हे समर्थक देत होते. यावेळी शाझिया इल्मी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकत नसल्याचे पाहून इल्मी यांनी 'भारत जिंदाबाद'चा नारा लावला. तीन भारतीय 300 पाकिस्तानी समर्थकांवर भारी पडले.
यावर प्रतिक्रिया देताना शाझिया इल्मी म्हणाल्या की, एक भारतीय म्हणून जगभरात कोठेही अपमानित केले जात असेल तर शांततापूर्वक आपला विरोध व्यक्त करणे आवश्यक आहे. कोणी आपल्या देशाबद्दल, आपल्या पंतप्रधानाबद्दल काहीही म्हणत असेल तर याविरोधात आवाज उठवला गेला पाहिजे.