नवी दिल्ली - प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले. भाजपमध्येच असून त्यांनी पक्षाच्या कामावर सतत हल्ला चढवत होते. त्यानंतर शेवटी त्यांनी काँग्रेसचा हात पकडला.
भाजपने यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांना पटणा साहिब येथून लोकसभेचे तिकीट दिले नाही. त्याजागी रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना पटणा साहिब येथून काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा भाजप नेतृत्वावर सातत्याने टीका करत होते. यावरुन हे स्पष्ट झाले होते की, आगामी लोकसभा निवडणुकीत सिन्हा यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही. नुकताच राहुल गांधी यांनी प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. या योजनेची स्तुती करत हा 'मास्टरस्ट्रोक' असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
शत्रुघ्न सिन्हा भाजपच्या स्टार प्रचारकांमधील एक राहिलेले आहेत. मात्र, आपल्या पक्षात आपल्याला महत्त्व दिले जात नसल्याचे सिन्हा यांनी बोलून दाखविले होते. तसेच पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाहंवर सिन्हा यांनी अनेकदा टीका केली होती. यावरुन सिन्हा दुसऱ्या पक्षात सामील होतील, असे वाटत होते.