भोपाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राम मंदिरावरील वक्तव्यावरुन भाजप नेत्या उमा भारती यांनी टीका केली आहे. काही लोकांना वाटते की मंदिर उभारुन कोरोनाला आळा घातला जाऊ शकतो, मात्र तसे नाही असे म्हणत पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. मात्र पवार यांचे वक्तव्य हे पंतप्रधान किंवा सरकार विरोधी नसून रामविरोधी असल्याची टीका उमा भारतींनी केली आहे.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिराच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी तीन किंवा पाच ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. तसेच, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले होते, की सध्या कोरोना महामारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. काही लोकांना वाटते की मंदिर उभारल्याने कोरोना जाईल, मात्र तसे नाही. त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारवर टीका केली होती.
तर यावर बोलताना उमा भारती म्हणाल्या, पंतप्रधान मोदी हे कधीही सुट्टी घेत नाहीत. तसेच, ते दिवसातील केवळ चारच तास झोप घेतात. त्यामुळे ते उपाययोजना करत नाहीत असे नाही. पवार यांचे वक्तव्य हे मोदीविरोधी किंवा सरकारविरोधी नसून, रामविरोधी आहे, अशा शब्दांमध्ये भारतींनी पवारांवर टीका केली.
हेही वाचा : सचिन पायलट कुचकामी आणि दगाबाज; गहलोत यांचे गंभीर वक्तव्य..