नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (एनआरसी) विरोधात दिल्लीतील शाहीन बाग येथे डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुर आहे. या महिला आंदोलकांनी व्हॅलेंटाइन डेनिमित्त मोदींनी शाहीनबाग येथे येऊन आमच्याबरोबर प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शाहीन बागेमध्ये यावे आणि आमच्यासोबत प्रेमाचा दिवस साजरा करावा. आम्ही मोदींसाठी एक प्रेम गीत गाऊ तसेच त्यांना एक भेट वस्तू देखील देऊ. मोदी कृपया शाहीन बागेमध्ये येऊन आमच्याशी चर्चा करा, असे कार्डमध्ये म्हटले आहे.
शाहीन बागमध्ये गेल्या 15 डिंसेबरपासून नागरिकत्व सुधारणा कायदा, एनसीआर आणि एनपीआरविरोधात मुस्लीम महिला धरणे आंदोलन करत आहेत. या आंदोलनामुळे एक मुख्य रस्ता बंद झाला आहे. दिल्ली हायकोर्टाने पोलिसांना हा रस्ता खुला करण्याचे निर्देश दिले होते, पण याबाबत अधिक प्रगती झालेली नाही. तसेच याप्रकरणी न्यायालयातही सुनावणी झाली होती. यावेळी सलग ५८ दिवसांपासून एका सार्वजनिक ठिकाणी निदर्शने सुरू ठेवणे चुकीचे आहे. निदर्शने करणे चुकीचे नाही मात्र, सार्वजनिक ठिकाणांना असे अडवून ठेवणे चुकीचे आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.