श्रीनगर : शाह फैजल या आयएएस अधिकाऱ्याने आपल्या पदाचा राजीनामा देत राजकीय पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकार केला गेला नसल्यामुळे ते पुन्हा आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
शाह यांनी जम्मू अँड काश्मीर पीपल्स मूव्हमेंट (जेकेपीएम) या पक्षाची स्थापना केली होती. मात्र, तरीही सरकारी वेबसाईटवर आयएएस म्हणून त्यांचे नाव होतेच. यासोबतच, त्यांनी रविवारी आपल्या ट्विटर हँडलवरून फाऊंडर ऑफ जेकेपीएम असा बायो हटवला. त्यामुळे ते पुन्हा आपल्या पदावर रुजू होण्याची शक्यता वाढली आहे.
फैजल हे प्रामाणिक आणि कठोर अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. २०१८मध्ये राजीनामा देतानाच त्यांना अनेकांनी सांगितले होते, की राजकारणामध्ये सहभागी होऊ नका. मात्र, तरीही त्यांनी आपला निर्णय घेतलाच.
यानंतर जर फैजल आपल्या पदावर पुन्हा कार्यरत झाले, तर जम्मू-काश्मीरमधील सर्वात कमी राजकीय कारकीर्द असणारे व्यक्ती म्हणून ते ओळखले जातील.