लखनौ - उत्तरप्रदेशमध्ये गेल्या २४ तासात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांबाबत शोक व्यक्त केला असून सरकारी यंत्रणांना हवी ती मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत.
मिळालेल्या माहिनुसार, सिद्धार्थनगर (४), देवरियात (३), बस्ती (३), बल्लिया (२) आणि आझमगढ, कुशीनगर, महाराजगंज, लखिमपूर आणि पिलिभीत येथे प्रत्येकी एका जणाचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थनगर येथे पत्र्याचे शेड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर, २ महिला गंभीर जखमी झाल्या.
देब्रुआ येथे २२ वर्षीय युवकाचा अंगावर वीजेचा खांब कोसळल्याने जागीच मृत्यू झाला. गौरीबाझार येथे ५५ वर्षीय इसरावती यांचा अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला तर, या गावातच ८ वर्षीय मुलाच्या अंगावर भींत कोसळल्याने त्याचाही मृत्यू झाला.