नवी दिल्ली - सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक पूर्व लडाखमधील चुशुल सीमा चौकीवर पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने सीमेवरील तणाव कमी करण्यावर चर्चा झाली. ही बैठक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता सुरु झाली होती. तर रात्री 2 वाजता ही बैठक संपली. यापूर्वी भारत आणि चीनदरम्यान चीनच्या मोलदो येथे आणि भारतातील चुशुल येथे चर्चा झाली होती.
गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन या दोन्ही देशांकडून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 5 जुलैला भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवर संभाषण झाले होते. सीमेवर शांतता प्रस्थापीत करण्यासाठी दोन्ही देशांनी पाऊल पुढे टाकवे. सीमा नियमांचे पालन करावे आणि सीमाभागातील शांती भंग होणार नाही, याची काळजी एकत्रितपणे घ्यावी, हे चर्चेत ठरले होते. त्यानंतर पहिल्यांदा सीमावाद निवळण्यास सुरुवात झाली.
सीमावाद निवळण्यासाठी चीनने फिंगर 4 आणि फिंगर 5 भागातून आपले सैन्य मागे सरकवले होते. तसेच दोन्ही देशादरम्यान झालेल्या करारानुसार पेट्रोलिंग पॉईंट 15 पासून चिनी सैन्य 2 किलोमीटर मागे सरकले होते. दरम्यान भारतीय सैनिकही सीमेवरून मागे सरकले आहेत.
पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांदरम्यान हिंसक संघर्ष झाला होता. या वेळी भारताचे 20 सैनिक हुतात्मा झाले होते. या हिंसक संघर्षाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चीनचे सुमारे 40 सैनिक मारले गेले होते. भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जेथे जेथे तणाव निर्माण झालेला आहे, त्या सर्व ठिकाणांवरील तणाव कमी कसा करता येईल याबाबत बैठकीत चर्चा करण्यात येत आहे.