नवी दिल्ली - देशाचे 'इंडिया' हे नाव बदलून फक्त भारत करण्याच्या याचिकेवर आज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कालच या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, सरन्यायाधीश शरद बोबडे हे सुट्टीवर असल्याने काल सुनावणी तहकूब करण्यात आली होती.
इंडिया हे नाव बदलून भारत करण्याची याचिका दिल्लीतील रहिवासी नमह यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. घटनेच्या अनुच्छेद १मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली आहे. यानुसार देशाचे नाव बदलता येऊ शकते. वेगवेगळ्या कागदपत्रांवर देशाचं वेगवेगळे नाव देण्यात आले आहे. आधारकार्डवर 'भारत सरकार' आणि ड्रायव्हिंग लायसन्सवर 'युनियन ऑफ इंडिया' तर पासपोर्टवर 'रिपब्लिक ऑफ इंडिया' अशी नावे आहेत. यामुळे संभ्रम निर्माण होतो, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.
इंडिया हे एक प्रतिकात्मक नाव आहे. तसेच भारतीय म्हणताना अभिमान वाटतो. तसेच इंडिया हे नाव बदलून फक्त भारत ठेवले, तर आपल्या येणाऱ्या पिढीसाठी देखील ती अभिमानाची गोष्ट असेल, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.