नवी दिल्ली - कोरोना विषाणूबाबत सरकार पूर्णपणे सतर्क आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले. यासोबतच त्यांनी लोकांना 'घाबरून जाऊ नका. मात्र, खबरदारी बाळगा' असा सल्ला दिला. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत पंतप्रधानांनी नागरिकांना हा सल्ला दिला आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी परदेशवारी करू नये, पंतप्रधानांचे आवाहन -
नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन करतानाच, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांनाही परदेशवारी टाळण्याचे आवाहन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते पुढे म्हणाले, की केंद्रीय मंत्रिमंडळातील एकही मंत्री येत्या काही दिवसांसाठी परदेशवारी करणार नाही. मी देशातील नागरिकांनाही अशी विनंती करतो, की गरज नसल्यास प्रवास टाळाच.
सरकार हे सध्याच्या स्थितीबाबत सतर्क आहे. आपणही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळून, या विषाणूचा प्रसार रोखू शकतो, असेही ते म्हटले.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सध्या कोरोनाचे ७३ रुग्ण आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : 'कोरोना आणि अर्थव्यवस्थेकडे पंतप्रधान साफ दुर्लक्ष करत आहेत'