नवी दिल्ली - सौदी अरबचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. आज त्यांचे दिल्लीत आगमन झाले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या मुद्द्यावर सौदीच्या राजकुमारासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे, दोन्ही देशातील संरक्षण संबंधावरही चर्चा होईल, असे सांगितले जात आहे.
भारताच्या दौऱ्यावर येण्याच्या आधी सलमान पाकिस्तानला गेले होते. पाकिस्तानहून थेट भारतात येण्यावर भारताने हरकत घेतली होती. त्यानंतर सलमान सोमवारी सौदी अरबला परतले होते. ते भारतात येण्याआधी सौदी अरबचे परराष्ट्र मंत्री अदेल अल जुबेर यांनी एक निवेदन जारी केले. त्यात ते म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न राजकुमार करतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजकुमार सलमान यांच्यात चर्चा होणार आहे. यात प्रमुख मुद्दा दहशतवादाचाच असेल, असे सांगितले जात आहे. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत आहे. तसेच, दहशतवादाचा पुरस्कार करत आहे. भारत राजकुमार सलमानसमोर हा मुद्दा मांडेल, असेही सांगण्यात येत आहे.
परराष्ट्र मंत्रालयातील सचिव टी. एस. त्रिमूर्ती म्हणाले, की दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक, पर्यटन माहिती आणि औद्योगीक क्षेत्रासंबंधी करार होतील. या भेटीत भारत आणि सौदीमधील नव्या संबंधाला सुरुवात होईल. पुलवामा हल्ल्याचा सौदी अरबने निषेध केल्याची माहितीही त्रिमूर्ती यांनी दिली.