नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढण्यासाठी काहीही करत नाहीये अशा प्रकारची टीका वारंवार होताना दिसून येत आहे. जर राज्य सरकार काही करत नाही, तर मग आतापर्यंत बरे झालेले रुग्ण काय भाभीजी के पापड खाऊन बरे झाले का? असा खोचक प्रश्न संजय राऊतांनी आज राज्यसभेत विचारला. ते राज्यातील आणि देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलत होते.
यावेळी राऊत म्हणाले, की राज्यातील धारावी आणि सायन कोळीवाडा या विभागांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. या भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यश राज्य सरकारचे आहे. ठाकरे सरकारने केवळ मुंबई-पुण्यातच नाही, तर प्रत्येक जिल्ह्यात कोरोना केअर सेंटर आणि चाचणी केंद्र उभारले. देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाला होता, तेव्हा राज्यात केवळ एक कोरोना चाचणी केंद्र होते, आज राज्यात आम्ही एकूण ४०५ चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
किमान जीएसटीचा परतावा तरी द्या..
भाजपचे नेते राज्य सरकारवर टीका करतात. मात्र त्यांनी हेही लक्षात घेणे गरजेचे आहे, की केंद्राने वैद्यकीय साधने देणे बंद केल्यामुळे राज्य सरकारला अतिरिक्त ३५० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. प्रधानमंत्री केअऱ फंड सुरू करुन केंद्राने जो हजारो कोटींचा निधी गोळा केला आहे, तो कशासाठी आहे? तो या देशातील राज्यांसाठी नाही का? केअर फंड का नसेना, किमान आम्हाला आमचा जीएसटी परतावा तरी द्या, जेणेकरुन आम्ही हा खर्च उचलू शकू असेही ते म्हणाले.
ही वेळ एकत्र काम करण्याची..
राज्यावर टीका होत आहे, आम्हीही इतरांवर टीका करु शकतो. हे चालतच राहणार आहे. मात्र, ही वेळ टीका करण्याची नाही, तर सध्याच्या परिस्थितीला मिळून सामोरे जाण्याची आहे, असे मत राऊत यांनी राज्यसभेत बोलताना व्यक्त केले.