अहमदाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हणून अहमदाबादचा आणि गुजरातचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी गुजरात भाजपने रविवारी केली.
कंगणा रणौत आणि संजय राऊत यांच्यामध्ये काही दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. कंगणा रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. याबाबत प्रतिक्रिया देताना, कंगणामध्ये अहमदाबादला 'मिनी पाकिस्तान' म्हणण्याची हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी केला होता. मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटल्याबाबत ती (कंगणा) जर माफी मागणार असेल, तर आपणही त्याबाबत (तिला माफ करण्याबाबत) विचार करू, असेही राऊत यावेळी म्हणाले होते.
यावर प्रतिक्रिया देताना गुजरात भाजपचे प्रवक्ते भारत पांड्या म्हणाले, की अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणून राऊतांनी अहमदाबादच्या जनतेचा अपमान केला आहे. आपल्या वक्तव्याबाबत त्यांनी गुजरात आणि अहमदाबादच्या नागरिकांची माफी मागायला हवी. तसेच, शिवसेनेने सूडभावनेने किंवा द्वेषापोटी उठसूट गुजरातची बदनामी करणे थांबवायला हवे.
हा सरदार पटेल, आणि गांधींजींचा गुजरात आहे. ५६२ संस्थानांना एकत्र करुन देशाला जोडण्याचे महत्त्वाचे काम पटेलांनी केले होते. जर पटेल नसते, तर आज जुनागढ आणि हैदराबाद हे पाकिस्तानमध्ये असते. तसेच, काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचे सरदार पटेलांचे स्वप्न होते. जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी कलम ३७० हटवून करुन दाखवले. हे दोघेही गुजरातमधूनच आले आहेत. त्यामुळे देशाच्या एकतेमध्ये गुजरातचे कायमच योगदान राहिले आहे, आणि इथून पुढेही राहील, असे पांड्या यावेळी म्हणाले.
हेही वाचा : कंगनाची पुन्हा टिवटिव; म्हणाली... 'संजय राऊत जी, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, मी मुंबईत येणारच'