नवी दिल्ली - कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या भाजप पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवरून आज माहिती दिली.
तुमच्या सर्वांच्या आशीर्वादांमुळे मी बरा होऊन घरी परतलो आहे. मला पूर्णपणे बरे होण्यास आणखी थोडा वेळ लागेल. आजारपणाच्या वेळी माझ्या पाठिशी उभे राहिल्याबद्दल सर्व भाजप नेते व कार्यकर्त्यांचे आभार मानतो. आजारपणात भारतीय जनता पक्षाने माझी ‘आई’प्रमाणे काळजी घेतली, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
गेल्या महिन्यात कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर पात्रा यांना गुडगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त कोरोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांना प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ताप आला आहे. त्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज त्यांची पहिली कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्याचा अहवाल आज रात्री किंवा उद्यापर्यंत येणे अपेक्षित आहे.