नवी दिल्ली - भारतीय लष्कराने एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड मॅसेजिंग अॅपची निर्मिती केली आहे. 'साई' (Secure Application for the Internet, SAI), असे या अॅपला नाव देण्यात आले आहे. गुरुवारी भारतीय सैन्याने यासंबंधी निवेदन जारी केले.
निवेदनात म्हटले आहे की, 'आत्मनिर्भर भारत' च्या आवाहनाच्या अनुषंगाने भारतीय सेनेने हे स्वदेशी अॅप विकसित केले. सुरक्षेची सर्व खबरदारी या अॅपची निर्मिती करताना घेण्यात आली. या अप्लिकेशनच्या अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर एन्ड टू एन्ड टेक्स्ट मॅसेजिंग, फाईल शेअरिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग या सर्व सेवा देण्यात आल्या आहेत. हे अॅप वापरण्यास व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारखे असल्यामुळे अत्यंत सहजतेने हाताळता येते. महत्वाचे म्हणजे, एन्ड टू एन्ड एनक्रिप्टेड मेसेजिंग प्रोटोकॉलमुळे साई अॅपचा सर्व डेटा अतिशय सुरक्षित राहणार आहे.
साई अॅपची निर्मिती कर्नल साई शंकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. भारतीय सैन्याच्या तंत्रज्ञांनी सध्या अँड्राईड अॅपच्या आवृत्तीची निर्मिती केली आहे. आयफोनसाठी या अॅपची आवृत्ती विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्यात येईल, अशी माहिती लष्कराने दिली आहे. साई अॅपमध्ये चॅटिंग लीक होण्याचा धोका टळणार असून सुरक्षिततेच्या दृष्टिने सर्व खबरदारी अॅप बनवताना घेण्यात आली आहे, अशी लष्कराने माहिती दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या अॅपचा आढावा घेतल्यानंतर कर्नल साई शंकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले होते. यावर्षी भारताने सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनला जबर धक्का दिला. सुरक्षा कारणास्तव चिनी कंपन्यांशी संबंधित ८९ अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली. सैन्य कर्मचाऱ्यांना फेसबुक, ट्रुकॉलर, इन्स्टाग्राम, पबजी यासारखे अॅप व गेम्स मोबाईलमधून काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर स्वदेशी अॅप विकसित केल्याने भारतीय सैन्याला व देशाच्या सुरक्षेस बळकटी मिळणार आहे.