आजमगढ - उत्तरप्रदेशातील आजमगढ येथील जिल्हा रुग्णालयाचा पाहणी करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह आले होते. यावेळी रुग्णालय प्रशासनाने आरोग्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि टेबल्सवरती चक्क भगव्या रंगाच्या चादरी अंथरल्या होत्या.
रुग्णालय प्रशासनाने स्ट्रेचर, व्हीलचेअर आणि आपतकालीन टेबलला भगव्या रंगाच्या चादरीने झाकले होते. यासंबंधी डॉक्टर सतीश कनोजिया यांना विचारले असता ते म्हणाले, रुग्णालयात दररोज नवीन कलर वापरला जातो. आज रुग्णालयात भगवा रंग वापरण्यात आला होता. राजकीय कारणासाठी भगव्या रंगाची चादर अंथरली का? या प्रश्नावर उत्तर देताना डॉक्टर म्हणाले, हे सर्व राजकीय चर्चांना उधाण देण्यासाठी बोलले जात आहे.
उत्तरप्रदेशातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आरोग्य मंत्री सिद्धार्त नाथ सिंह रुग्णालयाची तपासणी करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी आजमगढ येथील जिल्हा रुग्णालयांची पाहणी केली. यासोबतच त्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वैद्यकीय सोयी-सुविधांचा आढावा घेतला.