भोपाळ - भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत राहतात. यावेळी, विमानात हवी ती सीट न मिळाल्यामुळे, त्या तिथेच धरणे आंदोलनाला बसल्याची घटना समोर आली आहे. याबाबतीत त्यांना विचारले असता, त्यांनी मात्र असे काही झालेच नसल्याचे म्हटले.
काय आहे प्रकरण..?
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या स्पाईसजेट कंपनीच्या विमानातून, दिल्लीहून भोपाळला येत होत्या. विमानामध्ये त्यांना सीट नंबर 'ए-२' देण्यात आले होते. खासदार असल्यामुळे प्रोटोकॉल नुसार 'ए-१' हीच सीट मिळावी, अशी साध्वींची इच्छा होती. मात्र, विमान कंपनीने ही सीट अगोदरच दुसऱ्या एका प्रवाशाला दिली होती. त्यामुळे त्यांना दुसऱ्या सीटवर बसण्याची विनंती करण्यात आली.
भोपाळ विमानतळावर जेव्हा विमान उतरले, तेव्हा सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडल्यानंतरही साध्वी प्रज्ञा बाहेर आल्या नाहीत. त्यानंतर चौकशी केली असता असे समजले, की विमान कंपनीवर नाराज होऊन त्या आतच धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना वारंवार खाली उतरण्याची विनंती केली. मात्र, त्यानंतरही त्या नाराज असल्याचे पाहून विमानाच्या कर्मचाऱ्यांनी ही बाब विमानतळाच्या संचालकांना सांगितली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत, विमानतळ संचालक अनिल विक्रम हे स्वतः विमानात पोहोचले. त्यांनी खासदार प्रज्ञा यांना यापुढे असा प्रकार होणार नाही असे आश्वासन देत, त्यांना बाहेर येण्याची विनंती केली. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आश्वासनही विक्रम यांनी दिले. त्यानंतर २० मिनिटांनी प्रज्ञा ठाकूर बाहेर आल्या. यानंतर त्यांनी विमान कंपनीच्या सेवेविरोधात तक्रार दाखल केली.
या सर्व प्रकारामुळे भोपाळहून परत दिल्लीला जाणारे हे विमान २० मिनिट उशीराने निघाले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
हेही वाचा : चेन्नईमध्ये २९ लाखांचे सोने, सिगारेट अन् लॅपटॉप जप्त