नवी दिल्ली- सचिन पायलट यांनी काँग्रेस सोडताना पाहणे दुःखद असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे. पायलट यांनी पक्षवाढीसाठी आणि स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, असे देखील थरूर म्हणाले आहे.
पायलट यांनी अधिकृतरित्या कॉंग्रेस पक्ष सोडलेला नाही. अजूनही पुन्हा समेट घडवून आणला जाऊ शकतो, असे थरूर यांनी म्हटले. त्यांना ट्विटरवर पायलट यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याबद्दल विचारण्यात आले होते.
सचिन पायलट जर पुन्हा परत आले आणि त्यांनी पक्षाचे पुनरुज्जीवन आणि पुनर्बांधणी करण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यांचे स्वागतच आहे, असे मत थरुर यांनी व्यक्त केले
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंड करणे आणि पक्षाच्या व्हीपचे उल्लंघन करणे, यामुळे सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून काढले आहे. त्यासोबतच त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद देखील काढून घेण्यात आले.
काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी देखील आणखी एक मित्र पक्ष सोडत असल्याचे ट्विट केले होते.