चेन्नई - रस्त्याकडेला राहणाऱ्या कचरा वेचणाऱ्या महिलांच्या घरात तब्बल 2 लाख रुपये सापडले आहेत. यामध्ये काही चिल्लर आणि नोटांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रकमेमध्ये नोटबंदी करण्यात आलेल्या काही नोटांचा समावेश आहे, ज्याचे मूल्य 40 हजार रुपये असल्याचे समजते. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत.
राजेश्वरी(65) विजयालक्ष्मी (60) प्रभावती (57) अशी त्या कचरा वेचणाऱ्या महिलांची नावे आहेत. त्या चेन्नईच्या ओत्तेरी भागातील रहिवासी आहेत. या तिघीही परिसरात कचरा आणि प्लास्टिक गोळा करून विक्री करतात.
प्रभावती या गेल्या महिन्यात रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत आढळून आल्या होत्या, त्यांच्यावर पोलिसांच्या मदतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुसरीकडे विजयालक्ष्मी आणि राजेश्वरी या दोघी बहिणी सध्या निराधार परिस्थितीत रस्त्याच्या कडेला राहतात. पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी आमची स्वतःची कुठे जागा अथवा स्वतःचे घरही नसल्याचे म्हटले आहे.
रस्त्याकडेला असलेल्या घर वजा झोपडीत पोलिसांनी पाहिले असता, त्यात कचऱ्याचे ढीग पडले होते. पोलिसांनी तो स्वछ केला त्यावेळी घरात सर्वत्र चिल्लर आणि नोटा विखुरलेल्या आढळल्या. एका प्लास्टिकच्या भांड्यात चिल्लर होती आणि बॅगेत नोटा तसेच काही सोन्याचे दागिने ही आढळून आले. पोलिसांनी याची मोजणी केली असता, सुमारे 2 लाखाहून अधिक रक्कम झाली. त्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या 500 आणि हजार रुपयांच्या नोटही सापडल्या.
या कचरा वेचणाऱ्या महिलेकडे एवढे पैसे असून देखील ती खर्च करु शकली नाही. यामुळे नागरिक देखील अवाक झाले आहेत. यानंतर पोलिसांनी त्या महिलांचे घर स्वच्छ करून सापडलेली रक्कम आणि दागिने इतर-2 महिलांकडे सुपूर्द केले आहेत