हैदराबाद- शहर टास्क फोर्सने आज दुब्बाका भागातून १ कोटी रोख रक्कम जप्त केली आहे. याप्रकरणी टास्क फोर्सने दोन जणांना अटक केली असून, आगामी पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना ही रक्कम पुरवली जाणार होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सुरभी श्रीनिवास, असे आरोपीचे नाव असून त्याला आणि कार चालक रवी कुमार याला अटक करण्यात आली आहे. सुरभी हा दुब्बाका येथील भाजप उमेदवार रघुनंदन राव यांचा भाचा आहे. एका गुप्त माहितीवरून टास्क फोर्सच्या पथकाने एका कारचा पाठलाग केला. ही कार बेगमपेठकडून दुब्बाकाला जात होती. पथकाने कारला अडवले व श्रीनिवास आणि त्याच्या चालकाला अटक केली.
श्रीनिवास याने बेगमपेठ येथील विशाखा इंडस्ट्रीतून पैसे घेतले होते. हे पैसे पेडापल्लीचे माजी खासदार विवेका यांनी श्रीनिवास याला दिले होते. हे पैसे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना वाटण्याच्या हेतूने देण्यात आले होते. अशी माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त अंजनी कुमार यांनी दिली. तसेच, आम्ही १ कोटीची रक्कम जप्त केली असून दोन्ही आरोपींना बेगमपेठ पोलिसांच्या स्वाधीन केल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा- आरक्षणाच्या मागण्यांसाठी गुर्जर समाज पुन्हा रस्त्यावर