जयपूर- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई मौरीन वाड्रा आज सक्तवसुली संचलनालयासमोर (ईडी) हजर झाले. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना जयपूरला नेण्यात आले. ३ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांना दुपारच्या जेवणासाठी सोडले आहे. आता ते राहात असलेल्या राजमहल हॉटेलकडे गेले. मात्र, जेवणानंतर पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांना अवैध संपत्तीप्रकरणी ईडीने समन्स बजावले होते.
अवैध जमीन व्यवहाराप्रकरणी वाड्रा यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या आईलाही या प्रकरणाशी संबंध असल्याच्या संशयावरून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यानंतर वाड्रा यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट टाकली होती. मात्र, त्यांनी ईडीला सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. प्रियांका गांधीही जयपूरला पोहोचल्या होत्या.
राजस्थान उच्च न्यायालयाने मागील महिन्यात आई-मुलाला ईडीसमोर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांनी 'ईडीकडून बळजबरी केली जाण्याविरोधात' न्यायालयाकडे संरक्षण मागितले होते. आता वाड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर आपल्याला लक्ष्य करण्याचा आरोप केला. पत्नी प्रियांका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आपल्याला जाणीवपूर्वक छळण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला.
रॉबर्ट वाड्रा यांची फेसबुक पोस्ट
रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या ७५ वर्षीय आईला ईडीने समन्स बजावल्याबद्दल भाजप सरकारवर खुनशीपणाचा आरोप फेसबुक पोस्टमधून केला आहे. तसेच, सरकार सूडाने पेटलेले असून प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाईल, असाही आरोप केला. 'सरकार एका ज्येष्ठ नागरिकाला त्रास देत आहे. माझ्या आईची मुलगी कार अपघातात ठार झाली. एक मुलगा आणि पती मधुमेहाचे बळी ठरले. तिच्यासोबत कोणी नसल्याने मी तिला माझ्यासोबत माझ्या कार्यालयात ठेवत असे. आता तिच्यावरही दोषारोप केले जात आहेत. मात्र, वारंवार अशा बाबी घडत असल्याने मी अधिक खंबीर झालो आहे. देव आमच्यासोबत आहे,' असे या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
ईडीने २०१५ मध्ये वाड्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. बीकानेर येथील एका जमीन अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई केली होती. हे क्षेत्र पाकिस्तान सीमेच्या जवळच्या संवेदनशील भागात येत असून येथील जमिनीचे अवैध पद्धतीने वाटप झाल्याचा आरोप केला होता.
संबंधित अधिकाऱ्याने बीकानेर येथील ३४ गावांमधील सरकारी जमीन एका कंपनीच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या अत्यंत स्वस्तात खरेदी करण्यात आल्याचे सांगितले. या खरेदी व्यवहाराशी वढेरा यांचा संबंध असल्याच्या संशयावरून ईडीतर्फे त्यांची चौकशी करण्यात आली. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी या कंपनीने बीकानेरमधील जमीन खरेदी केली. या कंपनीवर ती चढ्या दरात विकल्याचा आरोप आहे.