नवी दिल्ली/अहमदाबाद - उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने काँग्रेस तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधातील मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबाद येथील न्यायालयात रिलायन्सने पाच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्रातून राफेल करारासंदर्भात लेख प्रसिध्द केल्याचा आरोप रिलायन्सकडून करण्यात आला होता. हा खटला मागे घेणार असल्याचे अंबानी यांचे वकिल राकेश पारेख यांनी न्यायालयात सांगितले, तशी सूचनाही काँग्रेस तसेच नॅशनल हेरॉल्ड यांना दिली असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.
रिलायन्स डिफेन्स कंपनीने काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चंडी, सुनील जाखड, अशोक चव्हाण, संजय निरूपम आदी नेत्यांविरोधात तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. राफेल कराराची घोषणा होण्याच्या काही दिवसांपूर्वी रिलायन्स डिफेन्स या कंपनीची स्थापना करण्यात आली होती, असा लेख नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रात प्रसिध्द झाला होता.