मुंबई- रिलायन्स समूहाच्या तेलाच्या तसेच रसायनांच्या व्यवसायात सौदी अरामको ही कंपनी 20 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. तसेच सौदी अरामको रिलायन्समध्ये 75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या रिलायन्स समूहाच्या ४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. ही गुंतवणूक कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिओकडून 5 सप्टेंबर पासून संपूर्ण भारतात गिगा फायबर इंटरनेट सेवा लाँच होणार आहे.
रिलायन्स समूहाने सोमवारी ४२ वी वार्षिक सर्वसाधरण सभा आयोजित केली होती. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिलायन्स समूहाकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ५ सप्टेंबर पासून रिलायन्स जिओ फायबर सेवा संपूर्ण भारतात व्यावसायिक पद्धतीने लॉन्च करण्यात येणार आहे. या सेवेअंतर्गत ग्राहकांना आता चित्रपट प्रदर्शित होताच त्याच दिवशी घरी बसून चित्रपट पाहता येणार आहे. या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असे नाव देण्यात आले आहे.
रिलायन्स जिओ फायबर या इंटरनेट सेवेत १०० एमबीपीस (मेगा बिट प्रतिसेंकद) पासून १००० एमबीपीस पर्यंत वेगाने इंटरनेट उपलब्ध असेल. या प्लॅनची किंमत ७०० ते १० हजार रुपये प्रतिमहिना एवढी असेल. तसेच जिओ फायबर या सेवे अंतर्गत देशभरात इंटरनेट सेवा आजीवन मोफत असेल असेही मुकेश अंबानी यावेळी सांगितले. याचबरोबर रिलायन्स समूहाकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा यावेळी करण्यात आल्या.