नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचाराबाबत अभिनेता दीप सिधूला आज अटक करण्यात आली होती. दिल्लीतील एका न्यायालयाने याप्रकरणी सिधूची सात दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. लाल किल्ल्यावर आंदोलकांनी धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यास दीप सिधू जबाबदार असल्याचा आरोप आहे. २६ जानेवारीनंतर तो फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर १ लाखांचे बक्षीसही जाहीर केले होते.
अटक केल्यानंतर सिधूला महानगर दंडाधिकारी प्रज्ञा गुप्ता यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांनी त्याला पोलीस कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला.
लाल किल्ल्यावर हिंसाचाराचा आरोप -
लाल किल्ल्यावर आंदोलकांनी ताबा मिळवला तेव्हा दीप सिधूने फेसबुक लाईव्हही केले होते. त्यानंतर त्याचे नाव चर्चेत आले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दीप सिधूला ताब्यात घेतले आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. त्यात हिंसाचार झाला होता. नियोजित मार्गावरून ट्रॅक्टर रॅली सुरू होती. मात्र, दीप सिधूने भडकावल्याने आंदोलकांनी लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. लाल किल्ल्यावर आंदोलक जाण्यास दीप सिधूच जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यावर निशाण साहिब हा धार्मिक ध्वज फडकावला होता. या आंदोलकांच्या घोळक्यात दीप सिधूही होता.
शेतकरी नेत्यांनी केला आरोप -
दीप सिधूला आंदोलनात हिंसाचार घडवण्यासाठी जाणूनबुजून भाजपानेच घुसवल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला होता. दीप सिधू हा भाजपाचा एजंट असून त्याला आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजपानेच घुसरल्याचे शेतकरी नेते म्हणाले होते. दरम्यान, अनेक भाजप नेत्यांनीही दीप सिधूशी संबध नसल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधान मोदी, दीप सिधू आणि अभिनेता आणि खासदार सनी देओल यांचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता.
हेही वाचा : तेलंगणाच्या राजकारणात येण्याचे जगनमोहन यांची बहीण शर्मिला यांचे संकेत..