मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत एरिक्सन कंपनीला ५५० कोटी आणि त्यावरच्या व्याजाची रक्कम पूर्ण भरण्यात आली असल्याचे रिलायन्स कम्युनिकेशनने जाहीर केले. 'आवश्यक असलेल्या सर्व रकमेची पूर्तता माझा मोठा भाऊ मुकेश आणि त्याची पत्नी नीता यांनी केली,' अशी माहिती रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी दिली. ही रक्कम न भरल्यास अनिल अंबानींना ३ महिन्यांच्या तुरुंगवासाला सामोरे जावे लागणार होते.
'माझा मोठा भाऊ मुकेश आणि त्याची पत्नी नीता माझ्या कठीण काळात माझ्यासोबत उभे राहिले. मी त्यांचे मनापासून आणि आदरपूर्वक आभार मानत आहे. त्यांनी आमच्या कुटुंबाच्या खंबीर मूल्यांचे महत्त्व उदाहरणासह दाखवून दिले आहे. मी आणि माझे कुटुंबीय त्यांच्याशी कृतज्ञ आहोत. आम्ही भूतकाळ मागे टाकत पुन्हा एकमेकांशी घट्ट जोडले गेलो आहोत,' अशा शब्दांत अनिल अंबानी यांनी मुकेश आणि नीता अंबानींचे आभार मानले.
एरिक्सन कंपनीचे देणे थकविल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अनिल अंबानी यांना १ कोटींचा दंड ठोठावला होता. तसेच, एक महिन्याच्या आत ही सर्व रक्कम चुकती करण्याचा आदेश दिला होता. तसेच, या आदेशाचे पालन न केल्यास अनिल अंबानींना ३ महिन्याचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनित शरण यांच्या पीठाने हा निर्णय दिला होता.
न्यायालयाच्या आदेशानंतर रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असून त्यांच्या आदेशानुसार इतर बाबींचीही पूर्तता करू, असे म्हटले होते
जाणून घ्या, काय आहे प्रकरण?
टेलीकॉम उपकरणांची निर्मिती करणाऱ्या एरिक्सन कंपनीने अंबानी यांच्याविरोधात ५५० कोटींची थकीत रक्कम न दिल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या ३ अवमानना याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीला निर्णय दिला. न्यायमूर्ती रोहिन्टन फाली नरिमन आणि न्यायमूर्ती विनित शरण यांनी अंबानी आणि त्यांच्या २ संचालकांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचे म्हटले होते. याशिवाय, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी या तिघांनाही प्रत्येकी १ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. दंडाची रक्कम न्यायालयाच्या कार्यालयात १ महिन्याच्या आत न भरल्यास या तिघांना १ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
याशिवाय, अनिल अंबानी, सतीश सेठ आणि छाया विराणी यांना ४ आठवड्यांच्या आत एरिक्सन कंपनीला सर्व रक्कम चुकती करण्याचे आदेश दिले होते. असे न केल्यास त्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने सुनावले होते.