नवी दिल्ली - आरबीआयचे गवर्नर शक्तीकांत दास यांनी जीडीपीच्या अनपेक्षित घसरणीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. तर सोबतच, त्यांनी लवकरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असा विश्वासदेखील व्यक्त केला. मागील काही महिन्यांपासूनच अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती दिसून येत होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून आरबीआय विविध दरांमध्ये कपात करत होती असेही त्यांनी स्पष्ट केले. जानेवारी 2019 पासून आरबीआयने बेंचमार्क व्याजदर सलग चार वेळा कमी केले. तर, केंद्रीय बँकेने रेपो (अल्प मुदतीचा कर्ज) दर वर्षभरात 1.10 टक्क्यांनी कमी केले.
"मला वाटते की, योग्य उपाययोजना केल्याने गोष्टी सुधारल्या पाहिजेत. हे फार सकारात्माक आहे की सरकार अतिशय वेगवान प्रतिसाद देत आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार सतत आमच्या संपर्कात आहे. ही सतत चालू राहणारी प्रक्रिया असेल आणि ते इतर आव्हानांना सामोरे जातील अशी अपेक्षा आहे", असे त्यांनी वृत्तवाहिन्यांना सांगितले.
सरकारने बऱ्याच उपाययोजनांची घोषणा केली आहे. यामध्ये, स्थावर मालमत्ता, निर्यातीसाठी प्रोत्साहन, बँकांचे एकीकरण तसेच, एमएसएमई आणि वाहन क्षेत्रातील सेवांसाठी विशेष उपाययोजनांची घोषणा केली आहे. संरचनात्मक सुधारणांच्या संदर्भात ते म्हणाले की आरबीआयने यापूर्वीच आपल्या वार्षिक अहवालात याचा उल्लेख केला आहे.
हेही वाचा : उत्तर प्रदेशातही 'एनआरसी' लागू होणार
ते म्हणाले, "एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी विपणन. कृषी विपणनामधील सुधारणांबाबत मी सरकारकडून काही कृती करण्याची अपेक्षा करतो."
पहिल्या तिमाहीच्या जीडीपी आकड्यांवर चिंता व्यक्त करत, आरबीआय गव्हर्नर म्हणाले की ही संख्या निश्चितच जास्त वाईट दिसते कारण आरबीआयने ५.8 टक्क्यांवर जीडीपी स्थिर होण्याचा अंदाज वर्तविला होता. ते म्हणाले, "मला वाटते की जवळजवळ प्रत्येकाने जीडीपी 5.5 टक्क्यांपेक्षा खाली जाणार नाही अशी अपेक्षा केली होती. त्यामुळे जीडीपी पाच टक्क्यांवर जाणे आश्चर्यकारक आहे."
सर्वच प्रगत देशांमधील दुसऱ्या तिमाहीमधील जीडीपी हा पहिल्या तिमाहीपेक्षा कमी होता. त्यामुळे मंदी आहे हे स्पष्ट आहे. मात्र, मी जागतीक मंदीच्या आडून आपल्या देशातील मंदीचे समर्थन करत नाहीये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अर्थव्यवस्था नेमकी कधी पूर्वपदावर येईल असे विचारले असता, सध्या जागतिक स्तरावरदेखील बऱ्याच गोष्टी सुरु आहेत, त्यामुळे याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी सौदीमधील तेल संकटाचे उदाहरण दिले, जे खूपच अनपेक्षित होते.
दुसऱ्या तिमाहीमध्ये विविध घटक कसे परिणाम करतील त्याचे विश्लेषण करून आरबीआय त्याचे मूल्यांकन करेल असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : वडिलांच्या मारेकऱ्यांना अटक करा, अन्यथा रोज मुंडण करणार, मुलीने घेतली शपथ