नवी दिल्ली - कोरोना विषाणू प्रकरणी सार्क देशांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित चर्चासत्रामध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीर प्रकरण उपस्थित केले होते. त्यावरून पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. एका मानवतावादी व्यासपीठाचा पाकिस्तानने नेहमीप्रमाणे गैरवापर केला, असे रविश कुमार म्हणाले.
'सार्क देशांचे चर्चासत्र हे कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यासाठी आयोजित केले होते. मात्र, मानवतावादी व्यासपीठाचा पाकिस्ताने गैरवापर केला, असे रविश कुमार म्हणाले. चर्चासत्रामध्ये मोदींनी केलेल्या घोषणावर काम सुरू आहे. आकस्मिक निधीही उभारण्यात येत आहे. तसेच ईराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आण्यात येत आहे, असेही रविश कुमार यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचे संक्रमण थांबवण्यासाठी सार्क देशांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. यावेळी चर्चेदरम्यान पाकिस्तानचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी जम्मू काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. जम्मू-काश्मीरमध्ये कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे आरोग्य आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीर खोऱ्यातून निर्बंध हटवावेत, असे ते म्हणाले होते.
दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात आलेल्या चर्चेत मालदीव, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, नेपाळ आणि भुतान या देशाच्या नेतृत्वांनी सहभाग घेतला.